औरंगाबाद विषयी माहिती

अनेकवेळा औरंगाबादेस संभाजीनगर म्हणून संबोधले होते. महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागातील महत्त्वाचा जिल्हा आहे. औरंगाबाद शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे तर जगप्रसिद्ध अजंठा-वेरूळ गुफा, बीबी का मकबरा, दौलताबाद देवगिरी किल्ला याच जिल्ह्यात आहेत. औरंगाबाद जिल्हा हा भारतातील एकमेव जिल्हा आहे ज्यात २ जगप्रसिद्ध हेरिटेज वास्तू (अजिंठा लेणी व वेरूळ लेण्या) आहेत. जिल्ह्यातील पैठण हे ऐतिहासीक शहर पैठणी साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. मुहम्मद तुघलकाने औरंगाबाद येथील दौलताबादेत आपली राजधानी वसवली होती (या मुळे औरंगाबाद हे एकेकाळी भारताची राजधानी होती असे म्हणण्यास हरकत नाही).

औरंगाबाद शहर प्राचीन काळातही समृद्ध होते. प्राचीन औरंगाबाद लेणी परिसर यास साक्षीदार आहे. पितळखोरा, अजिंठा, वेरूळ आदी प्राचीन स्थानांबरोबरच विकसित झालेले हे स्थान होय. त्यावेळी हे नगर राजतडाग या नावाने ओळखले जात होते. भारतातील प्राचीन महामार्गावरील हे एक वैभवशाली नगर होते.


औरंगाबादचा इतिहास

निजामशाही: या नगराचा नव्याने विकास झाला तो मलिक अंबरच्या काळात, दौलताबाद येथील निजामशाहीचे ते वजीर होते. त्यांनीच अंदाजे १६१० मध्ये निजामशाहीची राजधानी दौलताबादहून औरंगाबाद आणली. त्यावेळी या गावाचे नाव खडकी होते. नवखंडा महाल ही त्यांचीच निर्मिती होय. येथे त्याचंी राजधानी होती. त्यांनी येथे भूमिगत पाईपद्वारे पाणीपुरवठ्याची उत्कृष्ट व्यवस्था केली. आजही काही भागात ही टिकून आहे. नहर-ए-अंबरी म्हणून ही प्रसिद्ध आहे. भडकलगेटसह पाच दरवाजे, काली मशीद, जामा मशीद, काला चबुतरा इत्यादींची निर्मिती त्यांनीच केली. मलिक अंबर हे पूर्व आफ्रिकेतील ऍबिसिनिया (आताचे इथिओपिया) या देशातील एक गुलाम होते. आपल्या कर्तृत्वाने ते निजामशाहीचे मुख्य प्रधान झाले. मलिक अंबर नंतर त्यांचा मुलगा फतेहखान याने औरंगाबादचे नाव फतेहनगर ठेवले.

मोगल: यानंतर औरंगाबाद दिल्लीच्या मोगल साम्राज्यात समाविष्ट झाले. प्रथम शहाजहान बादशहाने हे शहर जिंकले. त्यांच्यानंतर औरंगजेब येथे दोन वेळा सुभेदार म्हणून राहिले. औरंगजेब बादशहाची शेवटची ५० वर्षेयाच शहरात गेली. त्यावेळी दक्षिण भारताची ही त्यांची राजधानीच होती. त्यांनीच फतेहनगर हे नाव बदलून १६५३ मध्ये या शहरास औरंगाबाद हे नाव दिले. त्यांच्या काळात किले अर्क हा किल्ला, त्या भोवतालची तटबंदी, हिमायतबाग, दिल्लीगेट, नौबतगेट इत्यादी दरवाजे निर्माण झाले.१६६६ हे वर्ष औरंगाबाद शहरासाठी विशेष महत्त्वाचे आहे. यावर्षी औरंगजेब बादशहाच्या भेटीस दिल्लीस जात असताना शिवाजी महाराज या शहरात मुक्कामास होते.

आसफजाही: औरंगजेबनंतर १७२० मध्ये त्यांचाच एक सरदार निझाम उल मुल्क यांनी येथे आसफशाही वंशाची सत्ता स्थापन केली. त्यांची राजधानी नवखंडा महालात होती. त्यांच्याच काळात गुलशन महाल, दमडी महाल, बारादरी इत्यादी वास्तूंची निर्मिती झाली. त्यांच्यानंतर आलेल्या दुसर्या निजामाने राजधानी हैदराबादेस स्थलांतरीत केली. १९४८ पर्यंत हैदराबादच्या निजाम संस्थानमधील हे एक प्रमुख शहर होते. पूर्वी ५२ दरवाजे व ५२ पुरे म्हणून या शहराची प्रसिद्धी होती. भडकल गेट, दिल्ली गेट, रंगीन गेट, पैठण गेट, मकाई गेट, इत्यादी विशाल दरवाजे आजही ऐतिहासिक काळाचे साक्षीदार आहेत.मागील १० ते १५ वर्षात या शहराची औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड प्रगती झाली आहे. चिकलठाणा, शेंद्रा, पंढरपूर, वाळूज तसेच पैठण रोड व बीड रोडवर औद्योगिक क्षेत्रे आहेत. दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडोर या प्रकल्पात या शहराचा समावेश झाल्यामुळे दिल्ली-मुंबई प्रमाणे हे शहर लवकरच प्रगती करू शकेल.पैठणी, हिमरू शाली, औरंगाबाद सिल्कच्या साड्या व चादरी प्रसिद्ध आहेत.

पर्यटन स्थळे

औरंगाबाद लेणी

हा लेणी समूह मकबर्यापासून अडीच किलोमीटर अंतरावर हनुमानटेकडी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मागील भागात आहे.
हा लेणी समूह पूर्व-पश्चिम डोंगररांगेत दोन गटात विभागलेला आहे. यात एकूण नऊ लेण्या आहेत. या लेण्या बौद्धधर्मीय म्हणून ओळखल्या जातात. यात मध्ये क्र. ५ भगवान पार्श्वनाथ यांची मूर्ती व क्र.६ मध्ये श्रीगणेशाची एक मूर्ती आहे. एक लेणी हीनयान असून उर्वरित आठ लेण्या महायान पंथाच्या आहेत. लेणी क्र. ४ मध्ये चैत्यगृह असून ही हीनयान पंथाची आहे. एक चैत्यग्रह सोडलयस बाकी सगळे विहार आहेत. ही सर्वात प्राचीन लेणी आहे. इ.स.तिसर्या शतकातील असावी. उर्वरित लेण्या ७ व्या शतकापय्रंत खोदण्यात आल्या. लेणी क्र. १ ते ७ व ९ या लेण्या प्रेक्षणीय आहेत. येथे हीनयान, महायान व वज्रयान हे सर्व बौद्ध पंथ येथे एकत्र आढळतात. येथे बोधिसत्व पद्मपाणी, अवलोकितेश्वर व वज्रपाणी यांच्या भव्या मूर्ती आहेत. पद्मपाणीच्या हातात कमळ, अवलोकितेश्वराच्या मुकुटात बुद्धाची मूर्ती व वज्रपाणीच्या मुकुटात स्तूप असते. पहिल्या गटापासून दुसर्या गटाचे अंतर अंदाजे एक किलोमीटर आहे. अजिंठा व वेरूळ प्रमाणे याही लेण्या रंगीत होत्या. रंगकामाचे अवशेष येथे आजही पाहावयास मिळतात.

लेणीक्र. २ : दीर्घिका, मध्यवर्ती दालन व प्रदक्षिणा मार्ग अशी या लेणीची रचना आहे. यातील गाभार्यात भगवान गौतमबुद्धाची प्रलंबपाद आसनातील भव्य मूर्ती आहे. उजवीकडे विविध आसनातील बुद्ध मुर्ती आहेत. यात शिल्पकाम भरपूर आहे परंतु त्याची झीज झालेली आहे.

लेणीक्र. ३ : हे एक प्रेक्षणीय विहार आहे. यातील सभा मंडपात बारा सुशोभित स्तंभअ ाहेत. सर्व स्तंभ वेगवेगळ्या नक्षीकामांनी सजविलेले आहेत. येथे एका स्तंभाच्या नाटेवर (तुळई) सूतसोम जातक कथेचे शिल्प कोरलेले आहे. गाभार्यात प्रलंबपाद आसनातील सिंहासनावर बसलेली भगवान बुद्धाची मूर्ती आहे. मूर्तीच्या उजव्या व डाव्या बाजूस आदरभावयुक्त भक्तजन दाखविण्यात आले आहेत. हे भक्तजन आफ्रिकेतील कृष्णवर्णीय असावेत असे त्यांच्या केसाच्या रचनेवरून वाटते.

लेणी क्र. ४ : ही येथील सर्वात प्राचीन लेणी आहे. इसवी सनाच्या तिसर्या शतकातील असावी. हीनयान पंथाचे हे चैत्यगृह आहे. यातील तुळ्याचे छत व स्तूपावरील कोरीव काम अतिशय कुशलतेने केलेले आहे.

लेणी क्र. ५ : या लेणीत जैन तीर्थंकर भगवान पार्श्वनाथ यांची ध्यानस्थ मूर्ती आहे.

लेणी क्र. ६ : या लेणीपासून पुर्वेकडील गटास आरंभ होतो. या लेणीची दोन दालने आहेत. पहिल्या दालनात श्री. गणेशाची मूर्ती आहे. त्यासोबत सप्तमातृका कोरलेल्या आहेत. बाजूला भगवान गौतम बुद्धाची मूर्ती आहे. दुसर्या दालनात भगवान बुद्धाची मूर्ती व काही बौद्ध शिल्पे आहेत.

लेणी क्र. ७ : त्या काळातील शिल्पकलेचे काही अप्रतीम नमुने आजही या लेणीत आहेत. सकाळची सूर्यकिरणे थेट गाभार्यात भगवान बुद्धाच्या मूर्तीला स्पर्श करतात. त्यामुळे ही मूर्ती सजीव व चैतन्यमयी भासू लागते. मूर्तीच्या एका बाजूला नर्तकीचा एक अलौकिक शिल्पपट आहे. हा शिल्पपट शिल्पकलेच्या इतिहासातील एक मानबिंदू समजला जातो. यात नृत्यात तल्लीन झालेली नर्तिका व वाद्यवृंदासह साथ देणार्या युवतींचे कोरीव काम देखणे व अतिशय विलोभनीय आहे. हा शिल्पपट अंधारात आहे. प्रकाश परावर्तीत करणार्या बोर्डाच्या साहाय्याने या शिल्पातील सौंदर्याचे दर्शन घडते. अंधार असलेल्या सर्व लेण्यांत अशा बोर्डाची व्यवस्था आहे. गाभार्यातील प्रवेश दारावर पद्मपाणी अवलोकितेश्वर यांची उभी मूर्ती असून त्यांच्या दोन्ही बाजूस अष्टमहाभयाचे प्रसंग कोरलेले आहेत. याच्या डावीकडील दालनात ध्यानी बुद्धाच्या व उजवीकडील दालनात पांचिक व हरितीचे शिल्प आहे.

लेणी क्र. ९ : ही येथील सर्वात भव्य लेणी आहे. यात भगवान गौतम बुद्धाचे महापरिनिर्वाणाचे विशाल शिल्प ओ. हे शिल्प अर्धवट व जीर्ण अवस्थेत आहे. या लेणीतील काही मूर्तिंच्या डोक्यावरील नागफणीचे काम अतिशय उत्कृष्ट आहेबीबी का मकबरा

बीबी का मकबरा हे इतिहास प्रसिद्ध स्मारक खामनदीच्या सान्निध्यात पानचक्की व औरंगाबाद लेणीच्या जवळजवळ मध्यावर आहे. येथूनच लेणीस जाण्यासाठी मार्ग आहे. याच लेणीच्या डोंगररांगाची नैसर्गिक पार्श्वभूमी या मकबर्यास लाभली आहे. मोगल सम्राट औरंगजेब यांची पत्नी बीबी रबिया-उल-दुर्राणी उर्फ दिलरास बानो बेगम यांच्या स्मरणार्थ हा मकबरा बांधण्यात आला आले.
राजपुत्र आजमशहा या औरंगजेबच्या मुलाने आपल्या मातोश्रीच्या स्मरणार्थ इ.स. १६५१-६१ मध्ये याची निर्मिती केली. त्यास सुमारास आगर्यातील ताजमहालाचे काम पूर्ण झाले होते. जे एक जागतिक आश्चर्य ठरले. त्याच ताजमहालाचे काम पूर्ण झाले होते. जे एक जागतिक आश्चर्य ठरले. त्याच ताजमहालाची ही प्रतिकृती आहे. त्यामुळे यास दक्षिणेचा ताजमहाल म्हणतात. दक्षिण भारतातील मोगलकालीन हे सर्वात भव्य व सुंदर स्मारक आहे.मुख्य मकबरा एका चौकोनी भव्य चबुतर्याच्या मध्यावर आहे. त्याच्या चारही कोपर्यावर उंच मिनार आहेत. मकबर्याचा खालील भाग व घुमट संगमरवरी असून त्यावर नाजूक व सुंदर कलाकृती कोरण्यात आल्या आहेत. इतर भाग शंख-चुन्याने प्लास्टर केलेला आहे. मकबर्याच्या आतील कबर अलंकाररहित व साधी आहे. तिच्या सभोवती नाजूक संगमरवरी जाळया आहेत. मकबर्याच्या बाहेरच्या भिंतीची लांबी ४५८ मीटर व रूंदी २७५ मीटर आहे. दक्षिणेस मुख्य प्रवेशद्वार आहे. पश्चिमेकडे मशीद, उत्तरेस दिवान-ए-आम व पूर्वेस दिवान-ए-खस या इमारती आहेत. इतर मोगलकालीन स्थापत्य शास्त्रानुसार यातही चारी बाजूस उद्याने आहेतवेरूळ कैलास लेणी

वेरुळ औरंगाबाद जिल्ह्यातील गाव आहे. वेरुळ लेणी येथून जवळ आहेत. औरंगाबाद शहरापासून अवघ्या ३० कि. मी. अंतरावर ही जगप्रसिद्ध लेणी आहेत. या परिसरात एकूण ३४ गुंफा आहेत. सह्याद्रीच्या सातमळा पर्वत रांगेतील डोंगरकड्यात कोरलेल्या या लेण्यांचे खोदकाम पाचव्या ते आठव्या शतकात पूर्ण झाले असावे तसा तज्ज्ञांचा अंदाज आहे. येथील प्रमुख ३४ गुंफापैकी १७ गुंफा हिंदू धर्म शैलीच्या आहेत, १२ बौद्ध पंथाच्या तर ५ जैन पंथिंयाचा प्रभाव असलेल्या आहेत. अलिकडच्या काळात आणखी २२ गुंफांचा शोध लागला असून त्यावर शैव संपद्रायाचा प्रभाव आहे. या गुंफांमधील कैलास लेणे म्हणजे स्थापत्य आणि शिल्पकलेचा हृदयंगम मेळ असून प्राचीन शिल्पकलेचा तो कळसच होय. ‘आधी कळस, मग माया’ ही संतोक्ती या ठिकाणी प्रत्यक्षात अवतरली आहे. कैलास लेणे हे एका सलग पाषाणखंडात कोरलेलं अतिशय भव्य आणि विस्तारित खूप मोठं लेणं आहे आणि ते डोंगराच्या पठारावरून खाली कोरलेलं आहे. भव्य द्वार मंडप, दोन अति उंच स्तंभ, पूर्ण आकाराचा दगडात कोरलेला भव्य हत्ती, त्यावरील शिल्पकला हे सारं इतकं अप्रतिम आणि जिवंत आहे की ही लेणी पाहताना माणूस हतबद्ध होतो. पुराणातील शैव प्रतिमा आणि प्रसंग या लेण्यात चितारलेले आहेत. हे लेणं इतकं विस्तृत आहे की ते पाहतानाच वेळ कसा निघून जातो ते कळत नाही. दहाव्या क्रमांकाची विश्वकर्मा लेणी दुमजली आहेत. त्यात खिडक्या आहेत. या ठिकाणी चैत्य विहार आणि स्तूप असून स्तुपात बैठी बुद्धमूर्ती आहे. या वास्तूत जे स्तंभ कोरलेले आहेत त्यावर नृत्य व संगीतात मग्न असलेल्या शिल्पाकृती कोरलेल्या आहेत. क्र.११ ची गुंफा म्हणजे तिमजली मठ आहे. क्र. २१ ची गुंफा रामेश्वर गुंफा या नावाने प्रसिद्ध आहे. घारापुरी येथील एलिफंटा लेण्यातील शिल्पकलेशी साधर्म्य असलेली क्र. २९ ची लेणी शिव शिल्पांनी व्यापलेली आहे. क्र. ३२ ची गुंफा जैन पंथियांचा प्रभाव असलेली आहे. या लेण्याच्या छतावर सुंदर कमळाकृती कोरलेली आहे. सिंहारूढ यक्षीचे शिल्पही या गुंफेत आहे. ही गुंफाही दुमजली आहे.देवगिरी किल्ला (दौलताबाद)

देवगिरी म्हणजे ’देवतांचा पर्वत’. पुढे महंमद-बीन-तुघलक ह्याने त्याचे दौलताबाद असे नामांतर केले. यादव राजवंशाने ह्या किल्ल्याचे निर्माण केले. ह्या काळात यादव साम्राज्य समृद्धी आणि उत्कर्षाच्या परमोच्च बिंदूवर होते. त्याची खबर अलाउद्दिन खिलजीला लागली आणि त्याने देवगिरीवर हल्ला केला. हा मुस्लिमांचा दक्षिणेवरचा पहिला हल्ला. हा हल्ला धरून एकून ३ हल्ले झाले देवगिरीवर. त्यात अनुक्रमे रामदेवराय, शंकरदेव आणि हरपालदेव ह्यांचा पराभव होउन देवगिरीवर मुस्लिम शासन सुरू झाले. एके काळी काही काळ ह्या किल्ल्याने भारताची राजधानी व्हायचा मानही मिरवलाय. पेशवाईतील २ वर्षेसोडता हा किल्ला आणि आजुबाजुचा प्रदेश पुर्णकाळ मुस्लिम शासकांच्या ताब्यात होता. ह्या किल्ल्याची रचना इतकी अभेद्य केलीय की हा किल्ला अपराजित आहे. ह्यावर जो कब्जा मिळवला गेला तो फक्त कपट कारस्थानं आणि फंदफितुरीने. देवगिरी किल्ल्याचे प्रवेशद्वार ः हत्तींच्या धडकेपासुन संरक्षणासाठी लावलेले महाकाय खिळे. ह्या किल्ल्यामधे बरेच दरवाजे आहेत आणी त्यांच्या दिशा आणी त्यांच्यामधली अंतरे अशा प्रकारे ठेवली आहेत की शत्रुला हल्ला करणे आणि रणनीती ठरवणे एकदम अशक्य होउन जावे. मुख्य महादरवाज्यातुन आत आल्यावर बर्याच तोफा मांडुन ठेवल्या आहेत.

भारतमाता मंदिर : आतमधे एक मंदिर आहे जे यादवकालीन जैन मंदिर होते. तेथे कुतबुद्दीन खिलजी ने मस्जिद बनवली. जेव्हा १९४८ साली हैद्राबाद संस्थान भारतात विलीन झाले तेव्हा त्या तिथे भारतमातेची मुर्ती स्थापन केली आणी ते ठिकाण भारतमाता मंदिर म्हणुन प्रसिद्धीस आले. त्या मंदिराच्या प्रांगणातील काही कोरीव खांब

चॉंद मिनार : भारतमाता मंदिराजवळ एक मोठा ३ मजली मिनार आहे. हे मंदिर तोडुन तिथे मस्जिद बांधली असल्यामुळे अहमदशहा बहामनीने हा उत्तुंग मिनार त्यावेळेच्या मशिदीजवळ बांधला. दिल्लीच्या कुतुबमिनार नंतर उंच मिनारांमधे ह्या ३ मजली चॉंद मिनारचा दुसरा क्रमांक लागतो.

चिनी महल : एके काळी ह्या महालाच्या भिंती चिनी मातीच्या नक्षीकामानी अलंकृत केल्या होत्या. ह्या महालाचा कारागृह म्हणुन वापर केला जात असे. औरंगजेबाने ह्या महालात संभाजीराजांच्या पत्नी येसुबाई आणि पुत्र शाहुराजे ह्यांना कैद करून ठेवले होते अशी वंदता आहे.

मेंढा तोफ : चिनी महालापासुन जवळच एका बुरुजावर ही मेंढा तोफ आहे. चारही दिशांना फिरू शकणार्या ह्या तोफेला मागच्या बाजुला मेंढ्याचे तोंड आहे त्यामुळे ह्या तोफेला मेंढा तोफ असे नाव पडले. मुस्लिम शासक हिला ’तोप किला शिकन’ म्हणजे ’किल्ला तोडणारी तोफ’ म्हणत. ह्या तोफेवर ही तोफ तयार करणार्याचे आणि औरंगजेबाचे नाव कोरले आहे.

खंदक : मेंढा तोफेच्या बुरुजावरून पुर्ण किल्ल्याचे दर्शन करता येते. आणी किल्ल्यात जाण्याच्या मार्गात एक मोठा खंदक आहे. ह्या खंदकात दोन स्तर आहेत. ह्या दोन्ही स्तरांमधे पाणी भरलेले असायचे. नेहमीच्या वेळी फक्त खालचा स्तर भरून पाणी असायचे. त्याने किल्ल्यात जा-ये करण्यासाठी असलेला पुल उघड असायचा. हल्ल्याच्या वेळी पाणी दुसर्या स्तरात सोडले जायचे जेणेकरून पुल पाण्याखाली जाउन शत्रु खंदकात पडून खंदकातील मगरींच्या भक्षस्थानी पडायचा. ह्या खंदकातील भिंती विशिष्ट पद्धतीने बांधल्या होत्या ज्याने त्यावर शिडी लावणे अशक्य होते.

अंधारी/ भुलभुलय्या : हा भुलभुलय्या ह्या किल्ल्याच्या अभेद्य रचनेचा कळस आहे. बालेकिल्ल्यात जाण्यासाठीचा हा मार्ग आहे. बालेकिल्ल्यात जाण्यासाठी हा भुलभुलय्या पार करावा लागतो. ह्याचे प्रवेशद्वार एखाद्या गुहेसारखे आहे. आणि हा पुर्ण मार्ग एकदम अंधारी आहे. अक्षरश: काळोख. काहीही दिसत नाही. भुलभुलय्या अशासाठी म्हणतात की हा पुर्ण मार्ग वर्तुळाकार जिन्याने बनलेला आहे. पायरी पायरी मधील अंतर विषम आहे. एक पायरी एकदम उंच तर एक पायरी एकदम लहान.

शत्रुला उल्लु बनवण्याची फुल तजवीज आहे इथे. हवा आणि प्रकाश येण्यासाठी काही झरोके आहेत. त्यात शत्रुने प्रवेश केला रे केला की तो डायरेक्ट खंदकात पोहोचलाच पाहिजे अशी सोय केलेली आहे. शत्रु जरा विचार करत थांबला की वरून दगडांचा मारा करायला छुप्या जागा बनवलेल्या आहेत.

बारादरी : सध्याला ह्या किल्ल्यावर चांगल्या स्थितीत असणरी ही एकच वास्तु आहे. शहाजहानने बनवलेला हा महाल अष्टकोनी आहे. ह्याच्या बाहेरच्या बाजुला १२ कमानी आहेत त्याने ह्याचे नाव बारादरी असे पडले. बारादरीवरून पुर्ण किल्ल्याचे आणी आजुबाजुच्या परिसराचे सुंदर असे विहंगम दृश्य दिसते.
अत्त्युच्च शिखर : हा ह्या किल्ल्यावरील अत्त्युच्च बुरुज. इथे एक मोठी तोफ आहे जीचे नाव आहे दुर्गा तोफ. इथे पोहोचे पर्यंत आपली फॅ फॅ होते, तर एवढी वजनदार आणि भव्य तोफ इथे कशी आणली असेल वाटून उगाच जीव दडपून जातो.