शैक्षणिक क्षेत्रातील माहिती

शिक्षण हा सर्वांचा अधिकार आहे असं सरकारला कायद्याने सांगण्याची गरज पडते, यावरूनच शिक्षणाबद्दलची आस्था आणि अनास्था या दोन्ही गोष्टी आपल्याकडे आहेत हे सिद्ध होते. केवळ साक्षर असणं वेगळं आणि सुशिक्षित असणं त्याहूनही वेगळं. साक्षर किंवा सुशिक्षित असणं, तेही हव्या त्या नेमक्या अभ्यासक्रमासह, ही आज काळाची गरज झालेली आहे. आमच्या बीड, उस्मानाबादचं पोरगं अमेरिकेतल्या सिलिकॉन व्हॅलीत जाऊन बसलं आहे, तसं त्याच गावांमधील राम्या अजूनही अक्षराविना धडपड करतो आहे. हीच शैक्षणिक विषमता आपल्याला खूप घातक आहे. मराठवाडा प्रांतातील सर्वांना सहजपणे हव्या त्या शिक्षणाची माहिती ज्याला-त्याला झाली पाहिजे असा प्रयत्न आम्ही चालविला आहे.

दहावी-बारावीनंतर पुढे काय? पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रमानंतर काय? असे प्रश्न पडतात. हे प्रश्न पडतात याचाच अर्थ, कोणत्या गावाला जायचं हे न ठरविता प्रवास सुरु केला असे म्हणता येईल.

१० वी नंतरच्या संधी

१) व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण कमी कालावधीत अर्थार्जन देणारे शिक्षण म्हणून ह्या शिक्षणाकडे पाहिले जाते. हे शिक्षण साधारणत: १ ते ३ वर्ष कालावधीचे असते. किमान कौशल्यावर आधारित हे शिक्षण असल्यामुळे हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना छोटासा व्यवसाय सुरु करता येतो, तसेच उद्योगधंद्यामध्ये कुशल कारागीर म्हणून नोकरी करता येते.

२) तांत्रिक शिक्षण कारखान्यांमध्ये तंत्रज्ञ म्हणून कार्य करण्यासाठी व मध्यम दर्जाचे उद्योगधंदे सुरु करण्यासाठी तांत्रिक शिक्षण हे उपयोगी ठरते. साधारणतः दहावीनंतर ३ ते ४ वर्षांचे अभ्यासक्रम असतात. हे अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी गणित व विज्ञान ह्या विषयात विद्यार्थ्यास गती असावी लागते. ह्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्याने दहावी परीक्षा गणित व विज्ञान विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असणे आवश्यक आहे.

३) उच्च माध्यमिक शिक्षण १० वी नंतर पदवी व त्यानंतरचे उच्च शिक्षण घेण्यासाठी हे शिक्षण गरजेचे आहे. साधारणतः कला, वाणिज्य व विज्ञान ही उच्च माध्यमिक शिक्षणाची मुख्य अंगे आहेत. हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील उच्च शिक्षण घेता येते.

१२ वी नंतरच्या संधी

१२ वी हा शिक्षणाचा महत्त्वाचा टप्पा आहे. १२ वी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी विद्यापीठातील अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यास पात्र ठरतो. कोणतेही पदवी शिक्षण घ्यावयाचे झाल्यास १२ वी परीक्षा उत्तीर्ण होणे अत्यंत आवश्यक आहे. १२ वी परीक्षा मुख्यतः खालील तीन शाखांमध्ये विभागली गेली आहे.

सामान्यतः १२ वी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पदवी शिक्षणासाठी खालील संधी उपलब्ध आहेत.

  • ज्या शाखेतून १२ वी परीक्षा उत्तीर्ण केली असेल त्या शाखेतून पदवी शिक्षण
  • व्यावसायिक अभ्यासक्रमाचे पदवी शिक्षण
  • त्या शाखेशी निगडित इतर अभ्यासक्रम

व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांना व्यवसायाच्या व नोकरीच्या विविध संधी सहजरीत्या प्राप्त होऊ शकतात. परंतु व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी चिकाटी, कौशल्ये, मेहनत, चिकीत्सक वृत्ती व गणितीय विषयांची आवड असणे आवश्यक असते.

करिअर मार्गदर्शनाविषयीच्या विशेष माहितीसाठी येथे क्लिक करा.

Graduation नंतर पुढे काय?

पदवी शिक्षण घेतल्यानंतर पुढे काय करायचं असा प्रश्न मला बरेच विद्यार्थी विचारतात. उद्योगजगताशी चर्चा करीत असतांना असे दिसून आले की, पदवी शिक्षण घेणाऱ्यास प्रचंड संधी उपलब्ध आहेत; पण याची खोलवर माहिती नसल्याने व त्या अनुषंगाने तयारी न केल्यामुळे पदवीधारक अनेक संधी गमावतांना दिसत आहे .

 

करीयर निवडणे आणि ते घडवणे हि आयुष्यातील प्रमुख बाब आहे. शिक्षणाची वाट निवडतांना आपण बरयापैकी माहिती घेऊन महाविद्यालयात प्रवेश घेतो. पदवी शिक्षण हि करतो परंतु करीयरच्या माहिती अभावी पुढे काय करायचे असा प्रश्न येतो

मित्रांनो, आर्ट्स कॉमर्स सायन्स बी.बी.ए. बी.सी.ए. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान इत्यादी सारखे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनेक करीयरच्या वाटा आहेत. आपणास योग्य असे करीयर निवडल्यास यास आवश्यक कौशल्य आणि तयारी करणे सोयीचे होते.

करीअर चार्ट